फुलंब्री (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क) :फुलंब्री पोलीस ठाण्यात तक्रार न घेतल्याने संतप्त रिक्षाचालकाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (२८ जानेवारी) रात्री घडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला थांबवले. अखेर त्याची तक्रार नोंदवण्यात आली, मात्र आत्मदहनाचा प्रयत्न केल्याबद्दल त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणाचे तपशील
पोलीस अंमलदार सय्यद मुजीबोद्दीन रफियोद्दीन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अब्रारखान गुलशरखान पठाण (वय ३५, रिक्षाचालक, फुलंब्री) हा मंगळवारी रात्री पोलीस ठाण्यात आला. त्याने मारहाणीत डाव्या डोळ्याच्या वर दुखापत झाल्याचे सांगितले आणि उपचारासाठी मेडिकल मेमो मागितला. पोलिसांनी मेमो दिल्यानंतर तो उपचार घेऊन परत आला आणि तक्रार नोंदवण्याचा आग्रह धरू लागला.
त्याने धमकी दिली की, “तक्रार घेतली नाही, तर मी स्वतःला जाळून टाकेन.” त्यानंतर तो पोलीस ठाण्यातून बाहेर गेला आणि काही वेळातच पाण्याच्या बाटलीत पेट्रोल घेऊन परत आला. पोलिसांसमोरच त्याने अंगावर पेट्रोल ओतले आणि खिशातून माचीस काढली. घाबरलेल्या पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्याला रोखले आणि शांत केले.
दोघांवरही गुन्हा दाखल
पोलिसांनी शेवटी अब्रारखानची तक्रार स्वीकारली आणि गुन्हा दाखल केला. मात्र, आत्मदहनाचा प्रयत्न केल्याबद्दल त्याच्यावरही बुधवारी (२९ जानेवारी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.