छत्रपती संभाजीनगर, दि. १४ (प्रतिनिधी) -पन्नासच्या दशकात जर अर्थशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक देण्याची प्रथा असती तर पहिले नोबेल पारितोषिक थोर अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच मिळाले असते. एवढेच नव्हे तर अर्थशास्त्रातील महान संशोधनाबद्दल त्यांना लागोपाठ तीन वेळा या पारितोषिकाचे मानकरी होता आले असते, असे प्रतिपादन भारतीय रिझर्व बँकेचे उपसंचालक, ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ डॉ. रमेश गोलाईत यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशन (दामा) हेल्थ केअर फाउंडेशनच्यावतीने आयोजित पदग्रहण तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारंभात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. भानुदास चव्हाण सभागृहात पार पडलेल्या सोहळयाच्या अध्यक्षस्थानी दामा हेल्थ केअर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ. एम.डी. गायकवाड, तर प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य उपसंचालक डॉ. भूषणकुमार रामटेके व घाटीचे उप अधिष्ठाता डॉ. भारत सोनवणे उपस्थित होते.
डॉ. गोलाईत पुढे म्हणाले की, त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या एवढी बुद्धिमत्ता असलेला अर्थतज्ज्ञ भारतात कुणीच नव्हता. अर्थशास्त्रीय संशोधनाबद्दल त्यांना सलग तीन वेळा नोबल पारितोषिक मिळाले असते. एवढे अर्थशास्त्रातील त्यांचे कार्य महान होते. मात्र दुर्देवाने डॉ. आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार व अन्य उपाध्यांमध्येच सीमित करण्यात आले. त्यांच्या प्रबंधाने जगभरातील अर्थविश्व आणि त्याची सूत्रे हाती असलेल्या ब्रिटिश अर्थविश्वात निर्णायक भूमिका बजावली. त्यातूनच भारतीय अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणारी रिझर्व बँक ऑफ इंडिया उभी राहिल्याचे ते म्हणले. डॉ. गोलाईत यांच्या या भाषणाने सभागृहांने टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना दाद दिली.
आरोग्य उपसंचालक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात बुद्ध, कबीर व फुले हे तीन गुरू आणि विद्या, स्वाभिमान व शील या तीन दैवतांचे मोठे महत्त्व असल्याचे सांगितले. घाटीचे उपअधिष्ठाता डॉ. भारत सोनवणे यांनी समाजाचे देणे लागतो ही भावना मनात ठेवून कार्य करावे असे आवाहन केले.
अध्यक्षीय समारोपात ‘दामा’चे अध्यक्ष डॉ. एम. डी. गायकवाड यांनी शहरात लवकरच ५०० बेडचे सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याचा संकल्प जाहीर केला. तसेच शहरातील बुद्धविहारांमध्ये गरजूंना सुपरस्पेशालिटी डॉक्टरांची विनामूल्य सेवा देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. सरचिटणीस डॉ. विशाल वाठोरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ४५ डॉक्टरांनी पदग्रहण केले.
सूत्रसंचालन डॉ. मनीषा अंभोरे यांनी तर आभार डॉ. संजय पगारे यांनी मानले. ‘दामा’चे उपाध्यक्ष डॉ. प्रमोद दुथडे, डॉ. विणा गायकवाड, डॉ. प्रमोद धनजकर, डॉ. प्रवीण चाबुकस्वार, डॉ. प्रज्ञा बनसोडे, डॉ. अविनाश सोनवणे, डॉ. साहेब वाकडे, डॉ. सागर वानखेडे, डॉ. नचिकेत शेरे, डॉ. सलेना लोणारे, डॉ. श्रुती चिंचखेडे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.