छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क):छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून भाजप आणि शिंदे गटामध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. जिल्ह्यात भाजपचे अतुल सावे आणि शिंदे गटाचे संजय शिरसाट या दोघांनीही या पदावर दावा केला आहे. त्यामुळे अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात शिंदे गटाचे आमदार अधिक असल्यामुळे त्यांचा दावा प्रबळ मानला जातो. मात्र, दरवेळी पालकमंत्रीपद शिंदे गटाला दिल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येते. यावेळी भाजपला पालकमंत्रीपद द्यावे, अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.
शिंदे गटाने जिल्ह्यातील सात जागांवर विजय मिळवला असून भाजपने फक्त दोन जागा लढवल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक वेळी बाजी मारणाऱ्या शिंदे गटामुळे भाजपला आपल्या स्थानिक नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याची संधी कमी मिळत असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
अतुल सावे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “नेत्यांनी जो निर्णय घेतला, त्याचा आम्हाला आनंदच असेल. जर शिरसाट पालकमंत्री झाले, तर नाराजीचा प्रश्न नाही.” तर, भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी स्पष्ट केले की, भाजप शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्रीपदासाठी आग्रह धरणार आहे.
या संघर्षाचा अंतिम निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागतो की भाजप आपल्या मागणीत यशस्वी ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.