छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क ):छत्रपती संभाजीनगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात रविवारी (२२ डिसेंबर) चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक पदासाठी परीक्षा झाली. यावेळी हायटेक कॉपीगिरीचा धक्कादायक प्रकार समोर आला. एका परीक्षार्थीने कानात इअरपीस आणि बुटामध्ये मोबाइल लपवून कॉपी करण्याचा प्रयत्न केला.
पर्यवेक्षकांनी हा प्रकार उघडकीस आणल्यावर संशयित परीक्षार्थीने पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळ काढला. या घटनेमुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. परीक्षार्थ्यांनी ही परीक्षा रद्द करून फेरपरीक्षेची मागणी केली.
घटनेचा तपशील:
सकाळच्या सत्रात परीक्षा सुरू असताना एका परीक्षार्थीच्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून झडती घेतली असता, त्याच्या कानात इअरपीस आणि बुटात मोबाइल सापडला. त्याच्याजवळ इअरपीस नियंत्रित करणारे मशीनही सापडले. प्रकरण उघड झाल्यावर त्याने पहिल्या मजल्यावरून उडी मारत पळ काढले.
चंद्रपूर जिल्हा बँकेचे कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी या प्रकाराची तोंडी माहिती मिळाल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, परीक्षार्थ्यांकडून लेखी तक्रार आलेली नाही आणि परीक्षा घेणाऱ्या कंपनीनेही काही कळवलेले नाही. परिस्थितीचे विश्लेषण करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.
परीक्षार्थ्यांची मागणी:
या प्रकारामुळे परीक्षार्थी आक्रमक झाले असून फेरपरीक्षा घेण्याचा आग्रह केला आहे. परीक्षेतील पारदर्शकतेसाठी कठोर उपाययोजना होण्याची मागणीही जोर धरत आहे.