पुणे: वाघोली पोलीस स्टेशनच्या समोरील फुटपाथवर झोपलेल्या तीन व्यक्तींना डंपरने चिरडले. या तीन मृतांमध्ये 22 वर्षीय विशाल विनोद पवार, एक वर्षाची मुलगी वैभवी रितेश पवार आणि दोन वर्षांचा मुलगा वैभव रितेश पवार यांचा समावेश आहे. वैभवी आणि वैभव हे बहिण-भाऊ आहेत. या घटनेचा आरोपी गजानन शंकर तोट्रे, डंपर चालक, मद्यपान करून वाहन चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
घटनेनुसार, रविवारी रात्री वाघोली पोलीस स्टेशनसमोरील फुटपाथवर नऊ लोक झोपले होते. रात्री एक वाजता आरोपी गजानन शंकर तोट्रे त्याच्या ताब्यातील MH 12 VF 0437 डंपरने फुटपाथवरील नऊ लोकांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडले. यामध्ये विशाल, वैभवी आणि वैभव यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य सहा जण जखमी झाले. जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमी आणि मृत व्यक्ती अमरावतीहून कामाच्या शोधात पुण्यात आले होते.
आरोपीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.