परभणी: परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी या कायद्याच्या विद्यार्थ्याचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती, मात्र सोमनाथ यांच्या आईने ही मदत नाकारली असून, न्यायासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.
“माझा मुलगा परत द्या”
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई वत्सला सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांच्या मदतीबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “माझ्या मुलाला मारहाण करून जीव घेतला. मला १० लाख रुपये नकोत. ते पैसे मंत्र्यांनी त्यांच्या खिशात ठेवावे किंवा पोलिसांना खाऊ घालावेत, पण मला माझा मुलगा परत पाहिजे,” असे त्यांनी खेदाने सांगितले.
शवविच्छेदन अहवालावर संशय
शवविच्छेदन अहवालानुसार, सोमनाथ यांचा मृत्यू श्वसनाचा त्रास झाल्यामुळे झाल्याचे नमूद आहे. मात्र, वत्सला सूर्यवंशी यांनी हा अहवाल फेटाळून लावत, “माझ्या मुलाला कोणताही आजार नव्हता. त्याच्यावर कसलाही उपचार सुरू नव्हता,” असे स्पष्ट केले.
“आरोपींना जन्मठेप हवी”
वत्सला सूर्यवंशी यांनी पोलीस कोठडीत त्यांच्या मुलाला मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबन न देता जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. “जर माझ्या मुलाच्या हत्येप्रकरणी न्याय मिळाला नाही, तर मी इथेच जीव देईन,” असा इशाराही त्यांनी दिला.
कुटुंबाची संतप्त प्रतिक्रिया
सोमनाथ याच्या भावानेदेखील सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. “गरिबांच्या मुलांनी शिक्षण घ्यायचं की गुन्हेगारी मार्गावर जावं, हे सरकारने ठरवावं. जर मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबावर असं काही झालं असतं, तर त्यांनी असाच निर्णय घेतला असता का?” असा प्रश्न त्यांनी विचारला.
सरकारवर टीकेची झोड
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरून सरकारवर जोरदार टीका होत असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. गरिबांच्या न्यायासाठी ही लढाई सुरू राहील, असा निर्धार सूर्यवंशी कुटुंबाने व्यक्त केला आहे.
राज्य सरकारने या प्रकरणी तातडीने कारवाई करावी आणि सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी समाजातून केली जात आहे.