देशातील सध्याची स्थिती अत्यंत गंभीर आणि वेदनादायी आहे. भारतीय लोकशाहीचा पाया कधी नव्हे इतका ढासळलेला दिसतो आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ – न्यायपालिका, विधिमंडळ, कार्यकारी यंत्रणा, आणि माध्यमे – हे निष्प्राण झाल्याची भावना जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. सत्तेचा असा पाशवी आणि असुरी उपयोग, जो लोकांच्या हक्कांचा गळा घोटतो, तो भारतीय लोकशाहीच्या इतिहासात फारसा दिसला नव्हता.
लोकशाहीची चारही स्तंभं दडपणाखाली
प्रत्येक स्तंभाला स्वतंत्र कार्य करण्याचा हक्क आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीत हे सर्व स्तंभ सत्ताधाऱ्यांच्या दडपणाखाली असल्याचा भास होतो. माध्यमांची भूमिका लोकशाहीत खूप महत्त्वाची असते, परंतु तीही आता निष्प्रभ झाली आहेत. सुजाण नागरिक भयग्रस्त झाले आहेत, आणि त्यांना धीर देणारे कोणीच उरले नाही, अशी स्थिती आहे.
१९७५ च्या आणीबाणीपेक्षा भयावह परिस्थिती
१९७५- ७७या काळात इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली होती. त्या काळातील भयावह स्थिती देशाने पाहिली आहे. मात्र, आज परिस्थिती आणखी गंभीर वाटते. त्यावेळच्या आणीबाणीला तरी एक अधिकृत स्वरूप होते; पण आज लोकशाहीचे गळे घोटले जात आहेत, आणि त्याला कोणतेही अधिकृत नाव देण्यात आलेले नाही.
महाराष्ट्रातील राजकीय गुंतागुंत
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती देखील अस्थिर आहे. भाजप प्रणित सत्तेला मिळालेले बहुमत, विरोधी पक्षांची हतबलता, आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत संघर्ष यामुळे जनता संभ्रमित झाली आहे. शरद पवारांची गृहमंत्री अमित शाह यांच्याशी भेट, तसेच उद्धव ठाकरे गटाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणे, यामुळे विरोधकांच्या राजकीय रणनीतीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
बॅलेट पेपरची मागणी आणि लोकांचा आवाज
ईव्हीएमच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. बॅलेट पेपरच्या वापरासाठी व्यापक जनचळवळ उभी करण्याची गरज आहे. पण असा लढा कोण उभारणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. काही प्रामाणिक पत्रकार, नेते आणि कार्यकर्ते जीव तोडून प्रबोधन करत आहेत,जनता जर सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचत असेल, तर हे प्रबोधन व्यर्थ ठरत आहे.
जनतेची भूमिका महत्त्वाची
सध्याच्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी जनतेला जागृत होणे गरजेचे आहे. सुजाण नागरिकांनी प्रामाणिक पत्रकारांना आणि नेत्यांना पाठिंबा दिला पाहिजे. आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला पाहिजे. सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रबळ लोकचळवळ उभारली पाहिजे. लोकशाही केवळ एक राज्यव्यवस्था नाही; ती लोकांचा विश्वास आहे, जो टिकविण्यासाठी सतत संघर्ष करावा लागतो. बॅलेट पेपरच्या माध्यमातून पारदर्शी निवडणुका, लोकशाहीचे चारही स्तंभ पुन्हा सक्षम करणे, आणि भयमुक्त वातावरण निर्माण करणे हे भारतीय लोकशाहीचे खरे उद्दीष्ट आहे. जनतेने आपले हक्क जाणून घेतले पाहिजेत आणि या संघर्षात भाग घेतला पाहिजे, कारण लोकशाही वाचविणे ही केवळ नेत्यांची नाही, तर प्रत्येक सुजाण नागरिकाची जबाबदारी आहे.