छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 28 (डि-24 न्यूज) – औरंगाबाद मध्य मतदारसंघातून उबाठा गटाचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात हे अधिकृत उमेदवार असणार असल्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. किशनचंद तनवानी यांनी माघार घेतल्यानंतर त्यांची जागा थोरात यांनी घेतली आहे. तसेच ठाकरेंनी तनवानी यांना जिल्हाप्रमुख पदावरून पदमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
उद्या बाळासाहेब थोरात हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तनवानी यांच्या मागे संघटनेची पूर्ण ताकद होती. सकाळी त्यांच्या सचिवाने अर्ज नेला होता, परंतु तनवानी यांनी अचानक माघार घेतली. हा निर्णय माध्यमांसमोर घेतल्याने संघटनेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तनवानी यांची जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी आता महानगरप्रमुख राजू वैद्य आणि त्र्यंबक तुपे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
मुस्लिम मतदारांचा एमआयएमकडे जाण्याचा जो भ्रम आहे, तो चुकीचा असल्याचे दानवेंनी सांगितले. महाविकास आघाडीमध्ये एकजूट असून, लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी एमआयएमऐवजी उबाठाला पाठिंबा दिला होता, यावरही त्यांनी भर दिला. प्रचारात पूर्ण ताकदीनिशी उतरून जनतेपर्यंत पोहोचण्याचा आणि विजय मिळवण्याचा आत्मविश्वास दानवेंनी व्यक्त केला.