महायुतीच्या विजयानंतर मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त करणारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. “जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना,” या सूचक वक्तव्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय पावलांबाबत तर्क-वितर्क रंगू लागले होते. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. या भेटीनंतर त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चांना उधाण आले आहे.
फडणवीस-भुजबळ यांची ही बैठक जवळपास अर्धा तास चालली. या भेटीनंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या चर्चांवर स्पष्टीकरण दिले. पत्रकारांनी फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत विचारले असता, भुजबळ म्हणाले, “मी जे बोलायचं ते बोललो आहे, यापेक्षा जास्त काही बोलणार नाही.” त्यांच्या या वक्तव्याने चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यतेवर विचारले असता भुजबळांनी कोणताही ठोस निर्णय जाहीर न करता खुलासा टाळला. मात्र, राजकीय वर्तुळात या भेटीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न सुरु आहे.
दरम्यान, छगन भुजबळांच्या या हालचालीमुळे त्यांच्या राजकीय भविष्यासाठी मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नसली तरी या हालचालींमुळे महायुतीतील अंतर्गत ताणतणाव पुन्हा समोर आला आहे.