छत्रपती संभाजीनगर – शहरातील सुभेदार रामजी आंबेडकर नगर, एकता नगर (जटवाडा रोड) येथे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या मजुरांच्या घरांवर अखेर महानगरपालिकेच्या बुलडोजरचा घाला पडला. या परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी तात्पुरत्या स्वरूपातील पत्रे, सिड आणि राहुट्यांमध्ये वास्तव्य करून आपल्या संसाराची घडी बसवली होती. परंतु महानगरपालिकेने त्यांच्यासाठी कोणतीही मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिली नव्हती. फक्त एमएसईबी विभागाने वस्तीला वीजपुरवठा उपलब्ध करून दिला होता.
वस्ती वाचवण्यासाठी संघर्ष, तरीही अन्यायच
या झोपडपट्टीवासीयांनी आपल्या घरांना संरक्षण मिळावे यासाठी अनेकवेळा आंदोलन, निदर्शने केली. शहरातील विविध पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांनीही त्यांना मदतीचा हात दिला. मात्र, महानगरपालिका आयुक्त श्रीकांत यांनी कोणतेही पर्यायी पुनर्वसन न करता थेट बुलडोजर फिरवून ही वस्ती उद्ध्वस्त केली.
मोदींचे घरकुल आश्वासन विरुद्ध आयुक्तांचा बुलडोजर
एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोरगरीबांना घरे देण्याची घोषणा करत आहेत, तर दुसरीकडे महानगरपालिका प्रशासन गरीब, दलित आणि आदिवासी समाजाला रस्त्यावर आणत आहे. झोपड्या तोडण्यात आल्यामुळे शेकडो नागरिक बेघर झाले असून त्यांना उन्हात, झाडाखाली आसरा घ्यावा लागत आहे.
आयुक्तांविरोधात समाजात तीव्र संताप
अतिक्रमण हटवले जाणे चुकीचे नाही, परंतु पर्यायी निवाऱ्याची व्यवस्था न करता बेघर करणे हा अन्याय आहे. प्रशासनाने कुठलाही पर्याय न सुचवता ही कारवाई केली, त्यामुळे दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय समाजामध्ये महानगरपालिका आणि आयुक्तांविषयी तीव्र रोष निर्माण झाला आहे.
महानगरपालिका जबाबदार – प्रशासनाला धारेवर धरण्याची गरज
महानगरपालिकेने त्वरित या नागरिकांसाठी पुनर्वसनाची उपाययोजना करावी, अन्यथा सामाजिक संघटना आणि राजकीय कार्यकर्ते रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडतील. शहरातील गोरगरीब, श्रमिक आणि कष्टकरी समाजाला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील.