नागपूर: औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेल्या वादाने सोमवारी संध्याकाळी नागपूरच्या महाल परिसरात उग्र स्वरूप धारण केले. दोन गट आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला, आणि काही समाजकंटकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून, काही वाहनांचे नुकसान झाले आहे.
परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी महाल भागात मोठा बंदोबस्त ठेवला आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. कोतवाली आणि गणेशपेठ परिसरातही हिंसाचाराचे काही प्रमाण समोर आले असून, काही वाहनांची तोडफोड करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. “नागपूर हे शांतताप्रिय शहर आहे. अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि प्रशासनाला सहकार्य करा,” असे त्यांनी सांगितले. तसेच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नागपूरकरांना संयम राखण्याचे आवाहन केले.
वादाचे मूळ कारण काय?
सायंकाळी सातच्या सुमारास शिवाजी चौकात एका गटाने घोषणाबाजी सुरू केली. याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या गटानेही घोषणाबाजी केल्याने तणाव वाढला. काही वेळाने भालदारपुरा भागात पोलिसांवर दगडफेक सुरू झाली, त्यामुळे परिस्थिती अधिक चिघळली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून जमाव पांगवला आणि परिसरात अतिरिक्त बंदोबस्त वाढवण्यात आला.
सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.