छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी – आंबेडकरी राजकीय चळवळ उभी राहत असतांनाच तिचे पंख छाटण्याचे काम प्रस्तापित पक्षांनी सुरुवातीपासूनच केले आहेत. भंडारा, मुंबईच्या निवडणुकीत बाबासाहेबांना निवडून येऊ दिले, भैय्यासाहेब आंबेडकर यांनीही नांदेड, कुलाबा आणि पंजाबमधुन निवडणूक लढविली त्यांनाही निवडून येऊ दिले नाही आणि आजही बाळासाहेब आंबेडकर यांचा पराभव होतो तो केवळ याच मानसिकता व भूमिकेतुन, एकूणच आंबेडकरी राजकीय चळवळ संपविण्याचे प्रस्तापित पक्षांचे मनसुबे हे काही नवीन नसून ते जुनेच असल्याचे प्रतिपादन प्रा. भारत सिरसाट यांनी केले.
पुढे बोलताना सिरसाट म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या प्रबुद्ध समाजाला डोळस करण्याचे, दिशा देण्याचे काम भैय्यासाहेब आंबेडकर यांनी केले. प्रबुद्ध भारत पक्षीकातून, भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक परिवर्तनासाठी, वंचित-शोषिकांच्या न्याय हक्काचा लढा बळकट केला. महू ते मुंबई अशी भीमज्योत काढून चैत्यभूमीचे निर्माण केले, दिक्षाभूमीच्या निर्मितीमध्ये आणि त्याची जागा मिळविण्यासाठी भैय्यासाहेबांचे महत्त्वाचे योगदान आहे. देशभरात बाबासाहेबांच्या असलेल्या पुतळ्याची संकल्पना ही भैय्यासाहेबांचीच होती.
ते (आज ता. १२) स्थानिक सत्यशोधक समाज प्रतिष्ठान कार्यालयात सुर्यपूत्र भैय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठान आणि सत्यशोधक समाज प्रतिष्ठानच्या वतीने भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित व्याख्यानातून बोलत होते.
अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. के. ई. हरिदास हे होते.
सूत्रसंचालन अमरदीप वानखडे यांनी केले तर आभार अनंत भवरे यांनी मानले.
यावेळी पंडितराव तुपे, ऍड. एकनाथ रामटेके, भारत दाभाडे, रतनकुमार साळवे, मगरे साहेब, इंजि. महेश निनाळे, सिद्धार्थ दाभाडे, जितेंद्र भवरे, अविनाश अंकुशराव आदी उपस्थित होते.