संभाजी नगर: आज विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
ब्राह्मणी, भांडवली, पुरुषत्ताक मूल्यसंस्कृतीच्या विरोधात विद्रोही सांस्कृतिक चळवळ 1999 पासून महाराष्ट्रभर कार्यरत आहे. महात्मा जोतिराव फुले यांनी ग्रंथकार सभेस पाठविलेले पत्र हा विद्रोहीचा वैचारिक पाया आहे. न्या.म.गो. रानडेंनी ग्रंथकार सभेत सहभागी होण्याचे निमंत्रण म. जोतीराव फुले यांना दिले; तेव्हा म. फुलेेंनी म्हटले होते की, तुमच्या ग्रंथांमध्ये अखिल मानवाचे हित होईल याचे बीज नाही. फुलेंनी उंटावरून शेळ्या वळणार्या घालमोड्या दादाच्या त्या संमेलनात सहभागी होण्यास ठाम नकार दिला होता. आमचे ग्रंथकार तयार होतील, तेव्हा ते स्वाभिमानाने आपली संमेलने भरवतील असेही म्हटले होते. ग्रंथकार सभेचे 20 व्या शतकातील स्वरूप म्हणजे अ.भा. मराठी साहित्य संमेलन आहे. ब्राह्मणी, भांडवली, पुरुषत्ताक मूल्य आणि विषमतावादी सांस्कृतिक विचारांचा विषारी प्रचार-प्रसार करणार्या संस्था, संघटना व संमेलनाच्या विरोधात भूमिका घेण्याचा फुलेआंबेडकरांचा संदेश मानून आपण विचार व संघटित कृती केली पाहिजे. याच भूमिकेतून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आजवर १८ संमेलने आयोजित केली गेली आहेत. अ. भा. साहित्य संमेलन आणि महामंडळ यांचा आजवरचा व्यवहार हा विषमतावादी राहिला आहे. चिपळूणच्या साहित्य संमेलनात परशुरामाची मूर्ती स्टेजवर ठेवण्याचा आग्रह, ठाण्यात संमेलन स्मरणिकेत महात्मा यांच्या खुन्याचा पंडित नथुराम’ असा उल्लेख करणे असेल. संयुक्त महाराष्ट्राचे सेनानी शाहीर अण्णाभाऊ साठे, शा. गव्हाणकर, शा. अमर शेख, शा. वामनदादा कर्डक, क्रांतीसिंह नाना पाटील, भाई उद्धवराव पाटील, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, शा. यशवंत चकोर यांना संमेलनासाठी साधे निमंत्रणही न देणे; उलट अनेक दांभिकांना अध्यक्षपदे बहाल करणे, स्वातंत्र सैनिक व थोर गांधीवादी नयनतारा सहेगल यांना यवतमाळला उद्घाटक म्हणून बोलावून नंतर अपमानित करणे, अशी अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या विषमतावादाची असंख्य उदाहरणे आहेत. किंबहुना विषमतावादी सांस्कृतिक राजकारणाचे ते मूखंडच आहे.
वर्तमानातील मनुवादी राजवटीत मानवी मूल्यांना पायदळी तुडवले जात आहे. राज्यघटनेने दिलेले हक्क काढून घेण्याचे काम चालले आहे. हुकुमशाहीवादी सरकारने विद्यार्थीविरोधी नवे शैक्षणिक धोरण, आदिवासीविरोधी वनविधेयक, कामगारविरोधी चार कायदे, शेतकरीविरोधी तीन कायदे आणून जनविरोधी कृतीचा सर्वोच्च कहर दाखवला. शेतकरी आंदोलकांना पाठिंबा देणार्यांना आणि पुरोगामी लोकशाहीवादी विचारवंत नेते कार्यकर्ते यांना देशद्रोही ठरवले जात आहे. शेतकरी आत्महत्यांनी आज उच्चांक गाठलेला आहे. समतावादी राष्ट्र उभारणीचा एकमय राष्ट्र निर्मितीचा फुले, शाहू, शिंदे, आंबेडकरी विचार धोक्यात आणला आला आहे. संविधान समर्पित स्वातंत्र्य, समता, बंधु-भगिनीभाव इत्यादी मूल्यांना पायदळी तुडवले जात आहेत. शेतकरी, कष्टकरी, दलित, भटके, विमुक्त आदिवासी, बहुजन, ओबीसी, अल्पसंख्यांक भयभीत झाले आहेत. अशा उच्चजातवर्गपितृसत्ताक हुकुशाहीविरोधात अ.भा. मराठी साहित्य संमेलन व त्यात जाणारे साहित्यिक एक शब्दही काढणार नाही. त्यांचा इतिहासच सत्ताधार्यांची लाचारी करत दक्षिणा ओरबाडण्याचाच आहे. म्हणून तर कुठल्याही सांस्कृतिक राजकीय दहशतवादाला बळी न पडता अघोषित आणीबाणीला विरोध करत सामान्य जनतेच्या बाजूने उभे राहणे, हीच एकमेव लोकशाहीवादी, खरी समतावादी स्वाभिमानी कृती आहे. यासाठी विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन-संयोजन व त्यातील सहभाग अगत्याचा आहे.
महात्मा गांधीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गोळ्या झाडत नथुराम प्रवृत्तीचे गौरवीकरण उघडपणे केले जात आहे. संसद, न्यायपालिका, आर्थिक संस्था अशा सर्व लोकशाही संस्था खिळखिळ्या केल्या जात आहेत. विरोधकांना संपविण्यासाठी शासकीय तपास यंत्रणा ईडी, सी.बी.आय. एनआयएचा वापर केला जात आहे. सांस्कृतिक दहशतवाद आक्रमकपणे अंमलात आणला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत ब्राह्मणी फॅसिस्ट शक्तींचा नंगानाच चालू आहे. इतिहास, संस्कृती परंपरेचा गैरवापर करत खोट्यानाट्या कंड्या पिकवत, जाणीवपूर्वक हिंसेचे शास्त्र तयार करणार्यांना राज्यकर्त्यांकडून बहुमान मिळत आहे. धार्मिक दंग्यासाठी वादग्रस्त प्रश्न उकरून काढले जात आहेत.
बहुजन समाजाला अवमानित करण्यासाठी महामानवांच्या इतिहासाचे विकृतीकरण केले जात आहे. ते करणार्या ब.मो. पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण देऊन भागले नाही, तर पद्मभूषण देऊन बहुजनांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. आता जेम्स लेन प्रकरणी पाहिलेले इतिहासाचे विकृतीकरण चित्रपटात आणले जात आहे, उद्या ते पाठ्यपुस्तकातही येण्याची शक्यता आहे. कारण महामानवांच्या बदनामीला केंद्रीय सत्तेचा राजाश्रय लाभला आहे. स्वत: राज्यपालच छत्रपती शिवाजी महाराज व आई सावित्रीबाई फुले यांची बदनामी करत आहेत. समतावादी विचारांना देशद्रोही ठरवले जात आहे. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, डॉ. कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे खुनी अजूनही मोकाट आहेत. इतिहासाचे विकृतीकरण, शिक्षणाचे ब्राह्मणीकरण, राज्यघटना बदलाचे राजकारण, समाजाचे जातीजमातीत विभागीकरण, लैंगिकतेचे वस्तुकरण, आदिवासींचे वनवासीकरण यांतून भारतीय संस्कृतीच्या मुळावर हल्ले चढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर कला साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात कष्टकरी व वंचितांच्या, शेतकर्यांच्या बाजूने अभिव्यक्तीच्या वाटा मोकळ्या करणारी विद्रोही साहित्य संमेलने 1999 पासून आपण आयोजित करीत आलो आहोत. समता, लोकशाही व आत्मसन्मानाची एक घनघोर लढाई, मराठी भाषिक संस्कृतीच्या क्षेत्रात लढली जात आहे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ जीवनाच्या सर्व क्षेत्रात समतावादी संस्कृती साहित्य विचारांचा पुरस्कार करते. विद्रोही साहित्य चळवळीच्या वतीने आजवर मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, सोलापूर, नंदुरबार, वाशी (नवी मुंबई), पुणे, मनमाड, धुळे, परभणी, बुलढाणा, हिंगोली, नाशिक, उदगीर इत्यादी ठिकाणी साहित्य संमेलने, एक आंतरराज्य (निपाणी), एक विद्रोही महिला साहित्य संमेलन (पुणे) यशस्वीपणे आयोजित करण्यात आली आहे. कालकथित बाबुराव बागुल, कवी वाहरू सोनवणे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. अजिज नदाफ, आत्माराम कनिराम राठोड, कॉ. तारा रेड्डी, तुळसी परब, डॉ.आ.ह. साळुंखे, संजय पवार, जयंत पवार, उर्मिला पवार, डॉ. श्रीराम गुंदेकर, विमल मोरे, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. प्रतिभा अहिरे. डॉ. आनंद पाटील, गणेश विसपुते यांसारख्या सर्जनशील साहित्यिकांनी विद्रोही साहित्य संमेलनाची अध्यक्षपदे भूषविली आहेत.
बहुभाषिकता, धार्मिक व सांस्कृतिक बहुविधतेसह संविधानाचा सन्मान हे या अ.भा. विद्रोही साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्ये असणार आहे. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा १५१ वे वर्ष, यास समर्पित हे संमेलन ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. म्हणूनच अघोषित आणीबाणीला नकार देण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि बहुजनांच्या समता संस्कृतीचा आवाज बुलंद करण्यासाठी, संविधान सन्मानासाठी, या संमेलनात सहकुटुंब सहभागी व्हा.. सहकार्य करा. विद्रोहाचा आवाज बुलंद करा असे आवाहन विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेस राज राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी कार्यकारी संघटक किशोर ढमाले, प्रा. रामप्रसाद तौर, के. ई. हरदास प्रा. भारत शिरसाठ, डॉ. प्रतिभा अहिरे, चित्रकार राजानंद सुरडकर, अनंत भवरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आपले,
विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी व समस्त स्वागत समिती