छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क):विभागीय क्रीडा संकुलासाठी आलेल्या निधीतून २१ कोटी ५९ लाख ३८ हजार रुपयांचा अपहार करणाऱ्या दोन कंत्राटी कामगारांची चौकशी सुरू असून धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ पदवीधर आणि १३ हजार पगार असलेल्या हर्षकुमार क्षीरसागर (वय २३, रा. बीड बायपास) यांनी अल्ट्रा लक्झरियस फ्लॅट्स, महागड्या विदेशी गाड्या, तसेच सोने खरेदीसाठी मोठी रक्कम उधळली आहे. याच प्रकरणात त्यांच्या सहकारी लेखापाल यशोदा शेट्टी हिच्यावरही मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला असून तिच्या पतीच्या नावावर लाखोंच्या गाड्या खरेदी केल्याचे उघड झाले आहे.
२०२३-२४ या कालावधीसाठी विभागीय क्रीडा संकुलाला मिळालेल्या ५९ कोटी ७ लाख रुपयांपैकी २१ कोटी ५९ लाख रुपयांवर हर्षकुमारने अपहार केला. या रकमेचा उपयोग स्वतःच्या आणि यशोदाच्या पतीच्या नावावर महागड्या गाड्या खरेदीसाठी करण्यात आला.
अल्ट्रा लक्झरियस फ्लॅट्स व महागड्या गाड्या:हर्षकुमारने विमानतळ परिसरातील आलिशान सोसायटीत स्वतःच्या नावावर ४ बेडरूमचा फ्लॅट तर यशोदाच्या नावावर २ बेडरूमचा फ्लॅट खरेदी केला. त्याशिवाय, बीएमडब्ल्यू कार, महागड्या दुचाक्या, आणि लाखोंच्या एफडीचा वापर करून मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवली.
फसवणुकीची पद्धत: हर्षकुमारने क्रीडा उपसंचालकांच्या जुन्या लेटरहेडचा गैरवापर करून बँकेला बनावट ई-मेल पाठवले आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून निधी आपल्या खात्यावर वळवला.
पोलीस तपास व कारवाई: या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने यशोदा व तिच्या पतीला अटक करून न्यायालयात हजर केले असून हर्षकुमार फरारी आहे. पोलिसांनी त्याची महागडी गाडी जप्त केली असून, पुढील तपास सुरू आहे.