छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी: प्रांजल पत्रकारिता ही लोकशाही टिकविण्याचा मजबूत आधार असून, पत्रकारांनी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी भक्कम पायाभूत भूमिका निभवली पाहिजे, असे प्रतिपादन सिडको पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी केले. ते एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने आयोजित दर्पण दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
सिडको एन-७ येथील दैनिक अट्टलमत कार्यालयाच्या प्रांगणात दर्पण दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांचा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतनकुमार साळवे व कार्यकारी अध्यक्ष रशपालसिंग अट्टल यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष रतनकुमार साळवे यांनी दर्पण दिनाचे महत्त्व विशद केले. त्यांनी सांगितले की, पत्रकारांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने संघटनेची वाटचाल सुरू आहे.प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सोमनाथ जाधव यांनी प्रांजल पत्रकारितेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि तो अधिक बळकट राहिला पाहिजे.
या कार्यक्रमाला रशपालसिंग अट्टल, ऍड. अशोक राठोड, रत्नाकर खंडागळे, जितेंद्र भवरे, नितीन दांडगे, प्रकाश खजिनकर, कैलास पवार, प्रल्हाद गवळी, संजय सोनकडे, यशस्विनी सोनखेडे, एन. व्ही. कस्तुरे, मुशायेद सिद्दीकी, दिलीप मोदी, सुरेश शिरसागर, जगन्नाथ सुपेकर, नदीम सौदागर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.