छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका):- जिल्ह्यातील मुलींचे जन्मदराचे प्रमाण घटले असून प्रति १००० मुलांमागे ८८९ मुली असे हे प्रमाण झाले आहे, ही बाब नक्कीच चिंताजनक आहे. जिल्ह्यातील गर्भलिंग चाचण्या आणि त्यानंतर होणाऱ्या कन्या भ्रूण हत्येस आळा घालण्यासाठी गर्भलिंगनिदान चाचणी होत असल्याची गुप्त माहिती द्यावी, अशी माहिती सिद्ध झाल्यास माहिती देणारास पारितोषिक देण्यात येईल,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
महिलांचे सक्षमीकरण, महिलांशी निगडीत विविध कायदे व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास श्रीमती सुवर्णा जाधव, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, एपीआय आरती जाधव, पीएसआय कांचन मिरघे, ॲड आशा शेरखाने, ॲड. रेणुका घुले, ॲड. ज्योती पत्की, ॲड. मयुरी कांबळे, डॉ. सारिका लांडगे, संगिता साळुंखे, माविम समन्वयक चंदनसिंग राठोड, डॉ. एम.आर. लढ्ढा आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी गर्भलिंग निदानास प्रतिबंध आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्रे(लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ सुधारीत कायदा २००३ ची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यात फिरत्या वाहनांमध्ये गर्भलिंग निदान चाचण्या करणाऱ्या अनधिकृत व्यक्ति वावरत असल्याचे जिल्हाप्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
त्याबाबत कडक उपाययोजना करण्यात येत आहे. तथापि, याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यास त्यावर थेट कारवाई करता येईल. त्यादृष्टिने लोकांनाही अशा गर्भलिंग निदान चाचणीबद्दल गोपनीय माहिती देता येणार आहे. त्यासाठी http://amchimulgimaha.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदविता येणार आहे. याशिवाय १८०० २३३ ४४७५ या टोल फ्री क्रमांकावरही लोक तक्रार नोंदवू शकता. तक्रार देणाऱ्याची माहिती गुप्त ठेवली जाते. या तक्रारीची अंमलबजावणी होऊन स्त्री भ्रूण हत्या रोखण्यात यश आल्यास तक्रारदारास शासनातर्फे १ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते. तरी नागरिकांनी गर्भलिंग चाचण्याबद्दल प्रशासनाला माहिती द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
जिल्ह्यात महिला सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने लगेचच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये महिला सुरक्षितता सर्व्हेक्षण सुरु करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. जिल्ह्यात बालविवाह रोखणे, मुलींचा जन्मदर वाढविणे, महिलांचे सक्षमीकरण करणे, महिलांच्या योजना त्यांचे अधिकार याबाबत जनजागृती करणे यासाठी सर्व विभागांनी ग्रामपातळीपर्यंत काम करावे,असे निर्देशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
०००००