छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क ): पैशांच्या वादातून कारमधून तरुणाचे अपहरण करण्याचा प्रयत्न फसला, कारण अपहरणकर्त्याचा मोबाईल घटनास्थळी पडला. नागरिकांनी हा मोबाईल सिटी चौक पोलिसांच्या ताब्यात दिला, ज्यावर आलेल्या कॉलमुळे अपहरणकर्ते हादरले. त्यांनी तातडीने तरुणाला सोडून पळ काढले. हा थरार गुरुवारी (९ जानेवारी) दुपारी सिटी चौक परिसरातील रोहिला गल्लीत घडला, ज्यामुळे पोलीस अधिकारी सहा तास सतर्क मोडवर होते.
घटनाक्रम:
पश्चिम बंगालमधील ३० वर्षीय सराफा कारागीर आणि पाचोडच्या तरुणांमध्ये ७ लाख रुपयांच्या सोने व्यवहारावरून वाद झाला होता. गुरुवारी दुपारी पाचोडच्या तरुणांनी रोहिला गल्लीतून कारागीराचे अपहरण केले. अपहरण करताना झटापटीत एक अपहरणकर्त्याचा मोबाईल घटनास्थळी पडला. नागरिकांनी मोबाईलसह सिटी चौक पोलिसांना माहिती दिली. प्रथम हा मोबाईल अपहृत तरुणाचा असल्याचे वाटले, परंतु तो अपहरणकर्ता ऋषिकेशचा असल्याचे निष्पन्न झाले.
मोबाईल कॉलमुळे फसला डाव:
मोबाईलवर आलेल्या कॉलमुळे पोलिसांना अपहरणकर्त्यांपर्यंत पोहोचता आले. मोबाईल गेल्याचे लक्षात येताच ऋषिकेश घाबरला आणि अपहरण केलेल्या तरुणाला सोडून पळून गेला. पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. अखेर, ऋषिकेशच मुख्य अपहरणकर्ता असल्याचे स्पष्ट झाले.
अपहृत तरुणाने तक्रार देण्यास नकार दिल्यामुळे प्रकरण तडजोडीत सुटले. मात्र, सिटी चौक पोलिसांनी सर्व संबंधितांना अधिक चौकशीसाठी बोलावले आहे.