छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क): मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी, या प्रमुख मागणीसाठी १९ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगरात सर्वधर्मीय व सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा सकाळी १० वाजता क्रांती चौकातून सुरू होऊन विभागीय आयुक्त कार्यालयासमोर संपन्न होईल.
मोर्चाच्या तयारीसाठी सिडको एन-३ येथील छत्रपती महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी सहा वाजता बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध समाज, पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मोर्चाच्या प्रचारासाठी शहरभर बॅनर लावले जाणार असून, सोशल मीडियाद्वारे प्रचार आणि लोकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. मोर्चा यशस्वी करण्यासाठी समन्वयकांची नियुक्ती केली जाईल, तसेच १० दिवसांचे विशेष अभियान राबवून अधिकाधिक नागरिकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.