छत्रपती संभाजीनगर ( निळे प्रतिक न्यूज नेटवर्क ): चिकलठाणा परिसरातील लालू नाईक तांडा येथे रविवारी (१५ डिसेंबर) सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. पाझर तलावात ४८ वर्षीय रोहिदास हरी राठोड यांचा बुडून मृत्यू झाला. राठोड दिवसभर शेतात काम करत होते, आणि सायंकाळी हात-पाय धुण्यासाठी पाझर तलावाजवळ गेले. अचानक पाय घसरल्याने ते तलावात पडले, आणि तलावात मासे पकडण्यासाठी टाकलेले जाळे अडकल्यामुळे ते बाहेर येऊ शकले नाहीत. घटनास्थळी चिकलठाणा पोलिसांनी नोंद घेतली आहे.
सावंगी परिसरातील विहिरीत आढळला मृतदेह
हर्सूल सावंगी परिसरातील तुळजापूर शिवारात सोमवारी (१६ डिसेंबर) सायंकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एका विहिरीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. शेजारच्या शेतकऱ्याने विहिरीत दुर्गंधी जाणवली आणि तिथे डोकावल्यावर त्याला मृतदेह तरंगताना दिसला. त्यानंतर फुलंब्री पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढला आणि घाटी रुग्णालयात पाठविला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४५ वर्षे असून, मृतदेह कुजलेला असल्याने हे दुर्दैवी अपघात चार ते पाच दिवसांपूर्वी घडले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
फुलंब्री पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे.