(छत्रपती संभाजीनगर – निळे प्रतिक न्यूज नेटवर्क) शासकीय आदिवासी विभागाच्या वसतिगृहातील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. गारखेडा परिसरातील एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयासमोर शुक्रवारपासून आंदोलन सुरू होते. शनिवारी (४ जानेवारी) सायंकाळी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी नाशिक येथे चर्चेला येण्याचे निमंत्रण देत सर्व समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले.
प्रमुख मागण्या:
शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहातील डी.बी.टी. रकमेत वाढ किंवा पूर्वीप्रमाणे भोजन व्यवस्था सुरू करणे.
पंडित दीनदयाल योजनेच्या डी.बी.टी. रकमेत वाढ.
वसतिगृहाची प्रवेश क्षमता वाढविणे.
सॅनिटरी पॅड विल्हेवाटीची मशिन उपलब्ध करणे.
अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करणे.
संगणक आणि वायफाय सेवा पुरवणे.
पिण्याच्या पाण्याची टाकी नियमित साफसफाई करणे.
गरम पाणी पुरवठा सुस्थितीत ठेवणे.
२०० मुलींमागे दोन नळ असल्याने नळांची संख्या वाढविणे.
शैक्षणिक वर्ष सुरू होताच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम तातडीने देणे.
कडाक्याच्या थंडी असूनही विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन न थांबवता शुक्रवारी रात्री कार्यालयाबाहेर मुक्काम केला होता. या आंदोलनात अॅड. सुभाष गावित, गणेश वसावे, सुनील वळवी, गुलाब वळवी, विलास पाडवी, अरुण पावरा, दीपक वसावे आणि महेश पावरा यांसारख्या अनेकांनी सहभाग घेतला होता.
(छत्रपती संभाजीनगरातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी वाचत रहा – निळे प्रतिक न्यूज नेटवर्क)