लासूर स्टेशन, गंगापूर (निळे प्रतिक न्यूस नेटवर्क ):- लासूर स्टेशन (ता. गंगापूर) येथील मुख्य रस्त्यावर गुरुवारी (५ डिसेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास खळबळजनक घटना घडली. कारमधील ४ लाख रुपये चोरून दोन चोरटे दुचाकीवरून पसार झाले.
गंगापूर तालुक्यातील माळीवाडगाव येथील शेतकरी रवींद्र मच्छिंद्र मोरे (वय ४३) यांनी १२ नोव्हेंबरला व्यापारी शिवाजी जाधव यांना मका विक्री केली होती. गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मोरे हे जाधव यांच्या कारने लासूर स्टेशन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत पैसे घेण्यासाठी आले होते. जाधव यांनी त्यांना चार लाख रुपयांची रक्कम दिली. त्यानंतर दोघे वैभव किराणा दुकानात सामान खरेदी करण्यासाठी गेले. ही रक्कम त्यांनी कारमध्ये ठेवली होती.
त्यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या दोन चोरट्यांपैकी एकाने, त्यांच्याजवळ जाण्याची संधी साधून, कारमधील रक्कम काढून घेतली आणि दोघेही चोरटे दुचाकीवरून पळून गेले. किराणा घेऊन परत आल्यावर मोरे यांच्या लक्षात आले की, कारमधील रक्कम गायब आहे. त्यांनी लगेच परिसरात शोध सुरू केला.
घटनेचा तपास करताना एका दुकानाच्या समोरील सीसीटीव्ही फूटेजमध्ये चोरटे कारमधून पैसे घेऊन दुचाकीवरून जाताना दिसले. मोरे यांनी तातडीने शिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून, सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे
या घटनेमुळे लासूर स्टेशन परिसरात खळबळ उडाली असून, व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.