छत्रपती संभाजी नगर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क ): छत्रपती संभाजीनगरातील शिवसेनेतील गळती थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर किशनचंद तनवाणी शिंदे गटात दाखल झाल्यानंतर, दोन दिवसांपूर्वी नंदकुमार घोडेले सपत्नीक शिंदे गटात गेले. विशेषतः, घोडेले हे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे अतिशय विश्वासू मानले जात होते. आता आणखी ९ नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची माहिती मिळताच, खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांनी डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दोन्ही नेत्यांनी स्वतंत्र बैठका आणि भेटीगाठी घेत नाराजांचे मन वळविण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.चंद्रकांत खैरे यांनी पक्षाच्या माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत खैरे यांनी घोडेले यांच्यावर जोरदार टीका केली. उपस्थितांनी पक्ष सोडणार नसल्याची ग्वाही दिल्याचे समजते. बैठकीला माजी महापौर त्र्यंबक तुपे, राजू वैद्य, सुदाम सोनवणे, गिरजाराम हळनोर, सीताराम सुरे, कमलाकर जगताप, मोहन मेघावाले, लक्ष्मण बखरिया, मीना गायके, सुभाष शेजवळ, मकरंद कुलकर्णी, वीरभद्र गादगे, सचिन खैरे, किशोर नागरे, मनोज गांगवे, ज्ञानेश्वर डांगे आदी उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनीही पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांच्या भेटी घेतल्या. माजी नगरसेवक किशोर नागरे, मकरंद कुलकर्णी, वीरभद्र गादगे तसेच मुकुंदवाडी परिसरातील कमलाकर जगताप आणि इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी खबरदारी घेतल्याचे समजते.ठाकरे गटातील आणखी ९ माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश सोहळा मुंबईत ६ जानेवारीला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यात सिडको-हडको, हर्सूल, जटवाडा परिसर, टीव्ही सेंटर, एन ८, मयूरनगर, सुदर्शननगर, शिवनेरी कॉलनी, सिंहगड कॉलनी या भागांतील माजी नगरसेवकांचा तसेच शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या एका माजी नगरसेवकाचा समावेश असल्याचे समजते.
मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नगरसेवकांचा प्रवेश सोहळा होणार असून, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरातही हा सोहळा होणार आहे. ठाकरे गटात काम करण्याची आता कुणाचीही इच्छा राहिलेली नाही, त्यामुळे सर्वजण आमच्याशी संपर्क साधत आहेत. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ म्हणाले की, आमच्याकडे नंदकुमार घोडेले, अनिता घोडेले, कला ओझा, विकास जैन, गजानन बारवाल, किशनचंद तनवाणी हे माजी महापौर आहेत. प्रदीप जैस्वाल यांनीही महापौरपद भूषवले आहे. ठाकरे गटाच्या कारभाराला कंटाळून लोक आमच्याकडे येत आहेत.दरम्यान, चंद्रकांत खैरे यांनी या पक्षप्रवेशाबद्दल म्हटले की, नगरसेवकांना समजावले आहे की, तिथे जाऊन त्यांचेच नुकसान होणार आहे. त्यामुळे आता कुणीच जाणार नाही, असे ते म्हणाले.