छत्रपती संभाजीनगर:
तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेल्या बिहार येथील बौद्धगया महाबोधी महाविहाराच्या स्वामित्वासाठी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी १२ फेब्रुवारीपासून महाविहारासमोर हजारो भंते व बौद्ध बांधव अनिश्चित कालीन आमरण उपोषणास बसणार आहेत, अशी माहिती श्री. आकाश लामा यांनी दिली.
याआधी बुद्धभूमी औरंगाबाद येथे आयोजित चर्चासत्रात देशभरातील पूज्य भंते, बौद्ध महासभा, सामाजिक कार्यकर्ते आणि समता सैनिक दलाच्या पदाधिकाऱ्यांनी या विषयावर चर्चा केली. महाबोधी महाविहार हे इतर धर्मियांच्या ताब्यात असल्याने बौद्ध भिकू संघाला विधिवत पूजा-अर्चनेची अनुमती नाही, हा प्रमुख मुद्दा अधोरेखित करण्यात आला.
बौद्धगया महाविहाराची ऐतिहासिक भूमिका:
इतर धर्मीय धार्मिक स्थळांप्रमाणे बौद्धगया महाविहारही बौद्ध धर्मियांच्या ताब्यात असावे, अशी मागणी करत भारतीय संविधानाच्या पायाभूत तत्त्वांचा उल्लेख करण्यात आला. १९४९च्या पिटी अॅक्टनुसार महाविहारावर इतर धर्मीयांचा अधिकार असल्याचा दावा केला जातो, परंतु यामुळे बौद्ध समाजाला त्यांच्या श्रद्धास्थानापासून वंचित ठेवले जात आहे.
१२ फेब्रुवारीपासून आंदोलनाची सुरुवात:
यासाठी १० फेब्रुवारीला बौद्धगया येथे महाशामनेर शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, बौद्ध बांधवांना सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही हा विषय नेण्याचे नियोजन असून न्यायालयीन पातळीवर लढा सुरूच ठेवला जाणार आहे.
जनजागृतीची तयारी:
आकाश लामा यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील बौद्ध विहारांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी बौद्ध बांधवांनी एकत्र येण्याचे आवाहन भंतेगण आणि सामाजिक नेत्यांनी केले आहे.
आंतरराष्ट्रीय लढ्याची तयारी:
महाविहारामध्ये शिवलिंग, गणेश मूर्ती यांसारख्या स्थापनेच्या विरोधात बौद्ध धर्मियांमध्ये प्रचंड नाराजी असून, हा लढा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
महत्त्वाचा संदेश:
“जोपर्यंत महाबोधी महाविहार बौद्ध धर्मियांच्या ताब्यात येत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील,” असा ठाम विश्वास आकाश लामा आणि उपस्थित भंतेगणांनी व्यक्त केला आहे.