छत्रपती संभाजीनगर | निळे प्रतिक न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगरच्या आकाशवाणी चौकातील आर. सी. बाफना ज्वेलर्समध्ये सहायक व्यवस्थापक संदीप प्रकाश कुलथे (रा. भानुदासनगर) याने तब्बल २ कोटी रुपयांचे पावणेतीन किलो सोने चोरल्याचा प्रकार उघड झाला आहे. हा प्रकार अवघ्या दीड महिन्यांत घडला असून, सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरीचा पर्दाफाश झाला.
कुलथेवर विक्री व स्टॉक व्यवस्थापनाची जबाबदारी होती. २४ ऑक्टोबर ते २४ डिसेंबर या कालावधीत हिशेबात सतत तफावत आढळल्याने व्यवस्थापनाला संशय आला. तपासणीमध्ये कुलथे सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी करताना दिसला. तक्रारीनुसार, त्याने २४ कॅरेटचे २६४.०८ ग्रॅम वजनाचे ७ कडे, ४७०.३९ ग्रॅम वजनाच्या १३ सोनसाखळ्या, १२८७.३२ ग्रॅम वजनाच्या ५० सोनसाखळ्या, आणि ६५६.५३ ग्रॅम वजनाचे १७ ब्रेसलेट चोरले. हा ऐवज एकूण १ कोटी ९२ लाख ९० हजार २९० रुपयांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कुलथेला अटक करण्यात आली असून, त्याने चोरलेले सोने विकून आलेला पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवला होता. मात्र, मोठ्या तोट्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे करत आहेत.