छत्रपती संभाजीनगर ( निळे प्रतिक न्यूज नेटवर्क ): महापालिकेने शहरातील मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण केल्याने रस्ते गुळगुळीत झाले आहेत, मात्र अनेक नागरिकांनी फूटपाथवर आणि रस्त्याच्या कडेला वाहने उभ्या करून रस्ते अरुंद केले आहेत. परिणामी, हे रस्ते २४ तास पार्किंगसाठी वापरले जाऊ लागले आहेत. यावर महापालिकेने कडक कारवाई करत अशा वाहनांवर नियंत्रण ठेवले आहे. तीन दिवसांत एकूण ४८ वाहने महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी जप्त केली आहेत.
शनिवारी चिस्तिया चौक ते सिडको एन ६ स्मशानभूमीपर्यंत कारवाई केली गेली, जिथे वाहनधारकांनी आपल्या घरचा रस्ता असल्यासारखे रस्त्यांवर वाहनं लावली होती. त्यांचा विरोध असला तरी, पथकाने कारवाई करत वाहने जप्त केली. जप्त केलेली वाहने आगामी आदेशांपर्यंत परत मिळवता येणार नाहीत, अशी सूचना प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली आहे. तीन दिवसांपूर्वी रोशनगेट ते कटकटगेट रस्त्याच्या कामाची पाहणी करताना, रस्त्याच्या मध्यभागी आणि कडेला उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश श्रीकांत यांनी दिले होते. शुक्रवारी (२८ डिसेंबर) कारवाई करताना रोशनगेट ते आझाद चौक, पोलीस मेसपर्यंत वाहने उचलली गेली, तर शनिवारी चिस्तिया चौक ते सिडको एन ६ स्मशानभूमीपर्यंत १७ वाहने जप्त केली गेली.