छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क):सिडकोतील ठाकरेनगर, एसटी कॉलनी आणि कामगार चौक परिसरातील नागरिकांना जलवाहिनीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सहा महिने उलटूनही जलवाहिनीचे काम पूर्ण न झाल्याने वारंवार अपघात होत आहेत. कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याने माजी नगरसेवक दामूअण्णा शिंदे यांनी गुरुवारी सकाळी १०.३० वाजता गरवारे स्टेडियम परिसरातील कंपनीच्या गोदामासमोर आंदोलन छेडले.
प्रथम टायर जाळून निषेध व्यक्त केल्यानंतर त्यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती चिघळण्याआधीच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन काम त्वरित सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. काम सुरू होताच शिंदे यांनी आंदोलन स्थगित केले.
नव्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, खोदकाम झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती वेळेत होत नसल्याने दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना अपघातांचा सामना करावा लागत आहे. याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतरही प्रशासन व कंपनीकडून दुर्लक्ष होत होते. अखेर, संतप्त शिंदे यांच्या आंदोलनामुळे काम सुरू करण्यात आले.
दरम्यान, या घटनेने परिसरातील नागरिकांना काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तातडीने प्रशासनाने हालचाली करत नागरिकांच्या समस्या सोडवण्यास सुरुवात केली आहे.