एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशन तर्फे आंदोलनाचा ईशारा.
छत्रपती संभाजीनगर: नाईक महाविद्यालयासमोर गुरुवारी भरदिवसा घडलेल्या प्रकाराने पत्रकारांच्या जीवितसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एका तरुणावर हल्ला चढवणाऱ्या गुंडांचा छायाचित्र घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकारावरच टोळक्याने हल्ला करत त्यांच्या मोबाइलसह गाडीचे नुकसान केले.
घटनाक्रम:
गुरुवारी नाईक कॉलेजवळ जालना रोड वर २६ डिसेंबर रोजी दुपारी काही गुंड एका तरुणावर धारदार शस्त्र, लोखंडी रॉड, आणि लाटाकाठ्यांनी हल्ला करत होते. यावेळी घटनास्थळी उपस्थित ‘दैनिक सकाळ’चे पत्रकार अजय हरणे यांनी आपल्या मोबाइलमध्ये या घटनेचे छायाचित्र घेतले. मात्र, हा प्रकार गुंडांच्या लक्षात येताच त्यांनी अजय हरणे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.
गुंडांनी त्यांच्या मोबाइलची तोडफोड करत गाडी (एमएच २० एके ८६६२) देखील नष्ट केली. एवढेच नव्हे, तर लाटाकाठ्याने डोक्यात वार करत त्यांना गंभीर जखमी केले. मोठ्या प्रयत्नाने गुंडांच्या तावडीतून सुटलेल्या अजय हरणे यांनी कार्यालय गाठून सिडको पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
शहरात पोलिसांची दहशत संपली.
या घटनेने शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. भरदिवसा चाललेल्या हल्ल्यात गुन्हेगारांवर पोलिसांची भीती जाणवत नसल्याचे दिसून येते. शहरात गुंडांचे वाढते उपद्रव आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेचा अभाव यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांचे अस्तित्व आणि गुन्हेगारांवरील नियंत्रण प्रभावी नसल्याचे या घटनेतून स्पष्ट होते.
सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल:
अजय हरणे यांनी केलेल्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
या घटनेनंतर पत्रकार संघटनांनी निषेध व्यक्त करत प्रशासनाकडे दोषींवर तातडीने कारवाईची मागणी केली आहे. पत्रकारांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, असेही संघटनांचे म्हणणे आहे.
न्यायाची मागणी:
पत्रकार हे समाजाचे चौथे स्तंभ मानले जातात. मात्र, अशा घटनांमुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
पत्रकारांचे काम समाजासाठी महत्वाचे असून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होणे हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
पत्रकार संघटनेचा इशारा
अशाच प्रकारचे पत्रकारावर जर हल्ले होत असतील,तर पत्रकारांनी काम कसे करावे?पत्रकाराच्या संरक्षणाविषयी पोलिसांनी तात्काळ भूमिका घ्यावी, दोषीना कठोर शासन करावे, शहरात शांतता प्रस्थापित करावी, गुंडागर्दीला आळा घालावा, अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा, रतनकुमार साळवे,अध्यक्ष एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेला आहे.