छत्रपती संभाजीनगर | निळे प्रतिक न्यूज नेटवर्क
वाळूज एमआयडीसी परिसरात चोरट्यांनी बुधवारी (२५ डिसेंबर) रात्री मोठा गोंधळ घालत ८ दुकाने फोडली आणि २ क्रेटा गाड्या चोरीला नेल्या. तिसऱ्या कारच्या चोरीचा प्रयत्न मात्र फसला. या घटनेने पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
चोरट्यांनी मातोश्री आणि प्रल्हाद कॉम्प्लेक्समधील किराणा, ट्रेडर्स, क्लिनिक, मॉलसह विविध दुकाने लक्ष्य केली. काही ठिकाणी फक्त किरकोळ ऐवज आणि पैसे चोरले गेले. साई गणेश मॉलच्या शटरमागील काच तोडण्यात अपयश आल्याने चोरट्यांना पळ काढावा लागला, आणि हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
दरम्यान, श्री स्वामी समर्थनगरातील संगीता कोटमे यांच्या अंगणातील क्रेटा कार आणि एएस क्लब परिसरातील तापडिया इस्टेटमधील श्रीरंग शेळके यांच्या क्रेटा कार चोरट्यांनी स्टेअरिंग लॉक तोडून लंपास केल्या. तिसऱ्या कारचा सायरन वाजल्याने चोरट्यांना पळ काढावे लागले.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.